एवढा भीषण दुष्काळ

.

केनियामध्ये गेल्या 40 वर्षांतला सर्वांत भीषण दुष्काळ सध्या पडला आहे. परिस्थिती इतकी बिकट आहे की देशातल्या दुसऱ्या सर्वांत मोठ्या, अँबोसेली राष्ट्रीय उद्यानात प्राण्यांचे मृतदेहच आढळत आहेत. कुठे महाकाय हत्ती, कुठे जिराफ, कुठे झेब्रा मृतावस्थेत आढळत आहेत. दररोज डझनभर प्राणी असेच दगावतायत, असं स्थानिक सांगतायत.


"जेव्हा असे महाकाय प्राणी मरण पावतात, तेव्हा खूप भयंकर काहीतरी घडतंय, असं मासई समाजात मानलं जातं," एका वनाधिकाऱ्याने बीबीसीला सांगितलं. 


केन्याच्या पर्यटन मंत्रालयाने सांगितलं की या दुष्काळात आतापर्यंत 205 हत्ती, 500 वाईल्डेबीस्ट, 400 झेब्रा आणि 50 म्हशी मरण पावल्यात. हवामान बदलाचा मोठा फटका आता जगभरात पाहायला मिळतोय. 


सरकार या परिस्थितीवर मात करायचा प्रयत्न करते आहे - कुठे पाण्याचे तलाव भरले जात आहेत तर कुठे प्राण्यांना चारा पुरवला जातोय. पण नैसर्गिक अधिवासही असा नैसर्गिकरीत्याच धोक्याचा होत चालला आहे, यामुळे चिंता वाढली आहे.