नांदेड : हजारो मशाल हाती घेऊन राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासह भारतयात्रींनी सोमवारी रात्री तेलंगणातून महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे प्रवेश केला. तेलंगणातून महाराष्ट्रात पदयात्रा येताच तेलंगणा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष रेवंत रेड्डी यांनी तिरंगा झेंडा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हाती सोपवला. यावेळी राहुल गांधी यांचे मराठमोळ्या पद्धतीने औक्षण करण्यात आले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर प्रहार केले. कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत सुरु असलेल्या भारत जोडो यात्रेचा उद्देश देश जोडण्याचा आहे. देशात सध्या द्वेष पसरवण्याचे काम केले जात आहे. या भारत तोडोच्या विरोधात भारत जोडो यात्रा आहे. ही पदयात्रा काश्मीरपर्यंत कोणीही रोखू शकत नाही. या पदयात्रेदरम्यान पुढील १४ दिवस महाराष्ट्रातील जनतेचे दुःख समजून घेण्यासाठी आम्ही आलो आहोत, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. (rahul gandhi criticizes pm narendra modi and bjp)

राहुल गांधी यांनी देगलूर येथे जमलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. आपल्या भाषणाची सुरुवात राहुल गांधी यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशी घोषणा देऊन केली. राहुल गांधी पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील पदयात्रेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून करत आहोत ही अभिमानाची बाब आहे. देशात आज ज्वलंत समस्या आहेत. पण केंद्र सरकार त्याकडे लक्ष देत नाही. केवळ चार पाच भांडवलदारांसाठी हे सरकार काम करत आहे. नोटबंदीने देशातील छोटे व्यवसाय डबघाईला आले. ४०० रुपयांचा गॅस सिलेंडर ११०० रुपये झाला. पेट्रोल, डिझेल १०० रुपये लिटर झाला, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावर एक चकार शब्दही बोलत नाहीत.