मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे कळमनुरीचे आमदार संतोष बांगर पुन्हा वादात अडकले आहेत. यावेळी मंत्रालय परिसरात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी संबंधित पोलिसाने पोलीस महासंचालक आणि गृह खात्याकडे तक्रार केली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही बांगर यांना समज दिल्याचे समजते. बांगर यांनी मात्र आपण कोणालाही शिवीगाळ केली नसल्याचा दावा केला आहे.

२७ ऑक्टोबरला मंत्रालयात जाताना सोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलीस कर्मचाऱ्याने प्रवेशद्वारावर थांबवत पास काढण्यास सांगितल्याने बांगर संतापले आणि त्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. 'मला ओळखत नाही का', अशी विचारणाही त्यांनी केल्याचे सांगितले जात आहे. पोलीस कॉन्स्टेबलने यासंदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडे तक्रार केली आहे, तर बांगर यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. 'मी कशासाठी पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालेन. तो बिचारा सकाळपासून तिथे काम करत असतो. कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्याशी मी अजिबात हुज्जत घातली नाही', असा दावाही बांगर यांनी केला.