नवी दिल्ली: टी-२० वर्ल्डकपमध्ये मेलबर्न मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात लढत झाली. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ४ धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात विजय मिळवला असला तरी आता सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील लढतीच्या निकालावर अवलंबून रहावे लागणार आहे. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत १६८ धावा केल्या होत्या, उत्तरादाखल अफगाणिस्तानने १६४ धावा केल्या.

वर्ल्डकपमधील या सामन्यात एक मोठी चूक झाल्याचे समोर आली आहे. ही चूक खेळाडूंकडून नव्हे तर चक्क अंपायरकडून झाली. ऑस्ट्रेलियाच्या डावात अफगाणिस्तानचा गोलंदाज नवीन उल हकने एका ओव्हरमध्ये फक्त ५ चेंडू टाकले आणि पाच चेंडूनंतर अंपायरने ओव्हर पूर्ण झाल्याचे सांगितले. विशेष म्हणजे दोन्ही संघातील एकाही खेळाडूला ही गोष्ट लक्षात आली नाही.