मुंबई : राज्यात मध्यावधी निवडणुका होणार असल्याचे भाकीत वर्तवतानाच पक्षाच्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दिले. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी प्रकल्पांच्या घोषणा केल्या आहेत, याचाच अर्थ राज्यात कधीही निवडणुका लागू शकतात', असे त्यांनी सांगितल्याचे समजते.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या विधानसभा संपर्कप्रमुखांची बैठक शनिवारी आयोजित करण्यात आली होती. उद्धव ठाकरे यांनी या बैठकीस मार्गदर्शन केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले. राज्यात मध्यावधी निवडणुका कधीही होऊ शकतात. त्यामुळे कामाला लागा, असे आदेश उद्धव यांनी दिल्याचे समजते. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यासाठी नवे प्रकल्प देण्याची घोषणा केली आहे. निवडणुका आल्यावरच अशा घोषणा केल्या जातात. त्यामुळे केंद्राकडून ही घोषणा करण्यात आली असून, याचा अर्थ राज्यात निवडणुका लागू शकतात', असे उद्धव ठाकरे यांनी विधानसभा संपर्कप्रमुखांना सांगितल्याचे समजते. खासदार अरविंद सावंत, आमदार मनिषा कायंदे यांनीही उद्धव यांच्या या संकेताला दुजोरा दिला.
0 टिप्पण्या