
आयुष्य हे
महादूने अंथरुणाला पाठ टेकली खरी पण काही केल्या त्याला झोप लागेना. उद्याच्या चिंतेने त्याचं मन अस्वस्थ होत होतं. तसा म्हणायला गेला तर घरात कर्ता तोच होता. आईवडील आणि एक आजा बस्स एवढचं त्याचं कुटुंब. खूप नवस सायासाने झालेला हा एकुलता एक मुलगा बालपण ओसरून घराचा कर्ता कधी झाला हे त्यालाही कळलं नाही. कोकणातील एका छोट्याश्या खेड्यात त्याचा जन्म. हातावरच पोट. मासेमारी करून चार पैसे मिळवायचा. विकले न गेलेले मासे त्याची आई अंगणात पसरवून ठेवायची. मग ते ही विकून चार पैसे मिळवायचे. रोज रोज मासे तरी किती मिळणार त्यात समुद्राचा भरती ओहोटीचा खेळ. मग मासे पकडायला बऱ्याच आत जावं लागायचं ते तळहातावर जीव घेऊनच. पण दुसरा पर्याय देखील नव्हता. सांगणारी लोकं खूप सांगायची की मुंबईला गेलं तर काही कामधंदा करता येईल चार पैसे गावाकडे पाठवता येईल.
खर तर चुकीचं काहीच नव्हतं पण माणसाचं मन मोठं कोडं असतं. तेच प्रश्न निर्माण करत आणि तेच सोडवत. घरची जबाबदारी आणि काळजी ह्यामुळे त्याचे पाय काही केल्या मुंबईकडे वळायला तयार नव्हते.
उद्याच्या काळजीने तो अस्वस्थ मनानेच झोपला. चिंतेने पोखरलेल्या मनाला कसली आलीय निवांत झोप. भल्या पहाटे उठून तयार झाला. सगळे झोपलेले होते. भिंतीवर लावलेल्या आजीच्या फोटो जवळ आला. फोटोवरच डोकं टेकवलं. कारण आशीर्वादाची खरी गरज आजच होती.
सायकल घेऊन सरळ शेठच्या घराकडे निघाला. जाताना त्या सहजच उगवत्या सूर्यनारायणाकडे बघितलं. मन शांत झालं. माझ्याही भाग्याचा उदय होऊ दे रे आता, माझ्याही अंगणात येऊ दे ना यशाची किरणं. तितक्यात एक मोठी लाट त्या उगवत्या सूर्याला स्पर्श करण्यासाठी उसळी मारून गेली. त्याला पावसाळी हवा देखील जाणवली. उगाच मन साशंक झालं. समुद्र खवळलेला नसला म्हणजे घेतलेली जबाबदारी नीट पार पडेल असा विचार करून मनोमन त्या सूर्याला नमस्कार करून तो शेठच्या घराकडे वळला. फाटकाबाहेर सायकल लावली. अंगणातच आंब्याने भरून ठेवलेल्या टोकऱ्या दिसल्या. शेठच्या गडी लोकांनी तयारी करून ठेवली होती. जवळपास २५-२६ टोकऱ्या होत्या. आणि त्या होडीने मुंबईकडे न्यायच्या होत्या. पण वाटेत काहीही नुकसान झालं तरी जबाबदारी त्याची. हे अस जबाबदारीचं कामं त्याने पहिल्यांदा घेतलं होतं. मनात धाकधुक होतीच. दुसऱ्याचा माल आपण फक्त पोहचवून येणारे त्यात दर्याने धोका दिला आणि नुकसान झालं तर जबाबदारी आपली. त्या विचारानेच कपाळावर आलेला घाम त्याने गळ्यातील उपरण्याने पुसला. शेठच्या अंगणातील गणपतीच्या छोट्याश्या मंदीरातील पायरीवर डोकं टेकवलं. टोकरीतील एक आंबा गणपतीजवळ ठेवावा अस क्षणभर त्याला वाटून गेलं. पण कर्तव्याने मनावर मात केली आणि नमस्कार करून तो उठला.
इतकं जोखमीचं काम ते ही ह्या पावसाळी हवेत कुणी घ्यायला त्यार नव्हतं म्हणूनच त्याचे चार पैसे जास्त मिळणार होते. आई वडिलांच्या जीवाला घोर नको म्हणून त्यांनाही काही सांगितलं नव्हतं. त्यात वेडी आशा हीच की काम फत्ते झालं की सरळ पैसे घेऊनच घरी जाता येईल.
गड्यांच्या मदतीने त्याने माल होडीत रचवला आणि निघाला. पाण्यात वलव्ह मारला तस त्याला फुटक्या नशिबाला लाथ मारल्यासारखं वाटलं. पाणी मागे सारत सारत होडी पुढे जाऊ लागली. तसा तो खाली बसला. हा दर्या त्याचा जीवभावाचा सखा, लहानपणापासून या लाटांशी गप्पा मारत तो वाढला. मित्रांबरोबर पोहोयला शिकला. किनाऱ्यावर येऊन आदळणाऱ्या लाटा त्याला रोज नव्याने उगवणाऱ्या दिवसासारख्या वाटायच्या.
होडी बरीच पुढे गेली तशी हवेचा जोर वाढतोय अस जाणवलं. वलव्हायला ताकद लागायला लागली. पाणी उगाचच विरोध करायला लागलं. त्यानं पटकन आभाळाकडे बघितलं ते अगदीच भरून आलेलं दिसलं. दूर कुठेतरी वादळाची चाहूल लागली. भरलेल्या आभाळाकडे आणि त्या दुर दिसणाऱ्या वादळाकडे तो हताश नजरेने बघत राहिला. होडी अजून हिंदकळु लागली तशी भरलेल्या टोकऱ्या हलु लागल्या. हेंदकाव्याने थोडा सुद्धा माल पाण्यात पडून चालणार नव्हतं. एखाद्या मित्राला बरोबर घ्यायला हवं होतं अस त्याला वाटून गेलं, पण कुणाला बरोबर घेणं म्हणजे मिळणाऱ्या पैश्यात वाटेकरी. होडीच्या एका टोकाला तो होता पण दुसऱ्या टोकाला कुणीच नव्हतं. आणि इथून त्या टोकाला जाणंही शक्य नव्हतं. हेलकावणाऱ्या होडी सारखी त्याच्याही मनाची अवस्था झाली. काय घडतंय काहीच कळेना, वाऱ्याचा जोर वाढत होता, आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली, समुद्र उसळू लागला, दूर दूर पर्यंत एकही जहाज दिसत नव्हतं, समुद्राचं पाणी आत येऊ पाहत होतं, तो शक्य तितकी ताकद लावून पाय रोवून उभा होता, वलव्हण्याच काम सुरूच होतं पण हातापायतील ताकद कमी वाटू लागली. डोळे भरून आले, आई वडील आणि म्हातारा आजा हे तिघे त्याला दिसू लागले. आपल्यानंतर शेठ त्यांच्याकडून पै न पै वसूल करेल, कसे आणि कुठून देतील ते पैसे?? हतबलेतेने तो जोरजोरात वलव्हू लागला, असेल नसेल ती सगळी ताकद लावत होता. पण निसर्गाच्या पुढे माणूस किती वेळ तग धरू शकणार?? समोर भरलेल्या आंब्याच्या टोकऱ्यांपुढे त्याला काहीच दिसत नव्हतं. जिवाच्या आकांताने तो वल्व्हत होता, घेतलेला वसा पुर्ण करायचाच होता, अजून किनारा किती दूर आहे हा त्यालाही अंदाज नव्हता, होडीच्या त्या टोकाला कुणीही नव्हतं म्हणून ते जास्त हिंदकळत होतं, दूर दिसणाऱ्या वादळाची दिशा बदलली तर तो सुखरूप पोहोचू शकत होता. पण निसर्ग त्याच्या उमलू पाहणाऱ्या भाग्याला विरोध करत होता, अंधार दाटून आला, वारा जोरात वाहू लागला, होडी अजून हिंदकळु लागली त्याची छाती धडधडू लागली,घशाला कोरड पडली, निघताना गणपती समोर एखादा आंबा ठेवायला हवा होता अस उगाचच मनात आलं, मदत म्हणून त्याने चौफेर नजर फिरवली पण खवळणाऱ्या समुद्रात त्याच्या एकट्याचीच होडी होती. हताश होऊन तो खाली बसला. त्याने स्वतःला निसर्गाच्या स्वाधीन करायचं ठरवलं आणि डोळे बंद केले.
मृत्यू किती भयानक असतो त्याही पेक्षा जबाबदारी जास्त भयावह असते. मनात विचारांचं काहूर माजलं होतं आणि
अचानक हिंदकळणारी होडी शांत होऊ लागली, वाऱ्याचा जोरही मंदावला. त्याने डोळे उघडले तर दूर किनारा दिसू लागला आणि वादळाने दिशा बदललेली होती.अत्यानंदाने त्याने आंब्याने भरलेल्या होडीकडे बघितलं तर सगळ्या टोकऱ्या व्यवस्थित होत्या. अचानक हेवेने उडणारा गुलाबीसर कपडा त्याला दिसला. त्याने डोळे पुसले आणि बघितलं तर होडीच्या दुसऱ्या टोकावर त्याची पाच वर्षांपूर्वी गेलेली आजी बसलेली होती.
कोण म्हणतं गेलेल्या व्यक्तीचा आशीर्वाद उपयोगी नसतो??
0 टिप्पण्या