मुंबई : सुरक्षित प्रवासी वाहतुकीसाठी ५,१५० विद्युत बस घेणे, सीएनजीऐवजी २ हजार डिझेल वाहनांचा समावेश करणे, वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती यांसह एकूण २६ विषय असलेल्या संचालक मंडळाची बैठक सलग दुसऱ्यांदा रद्द झाली. अध्यक्ष नसल्याने निर्णय प्रक्रिया रखडली आहे. राज्यात नोकरभरतीच्या हालचालींना वेग आलेला असताना एसटी महामंडळावर अध्यक्ष देता का अध्यक्ष, असे म्हणण्याची वेळ ओढावली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळाचा मर्यादित विस्तार झाला आहे. अनेक महामंडळाचे अध्यक्षपद रिक्त आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. त्यांना वेळ नसल्याने ४ नोव्हेंबर आणि २८ ऑक्टोबर या दिवशी होणाऱ्या बैठका रद्द झाल्या. विशेष म्हणजे, या दोन्ही बैठका पूर्वनियोजित होत्या. मुख्यमंत्री सचिवालयाने बैठकीची तारीख-वेळ निश्चित केली होती.